कवी विश्वातील दिग्गज नाव म्हणजे कवी ग. दि. माडगूळकर. त्यांच्या कविता एवढ्या उच्च कोटीच्या असतात की, वाचणारा आपल्याच विश्वात हरून जातो. मी पहिल्यांदा जोगिया ही कविता युटूबवर ऐकली होती. ती मला एवढी आवडली की, ती परत परत वाचता यावी म्हणून एका डायरी मध्ये लिहून घेतली. आणि जेव्हा कधी मन होतं तेव्हा ती वाचत बसतो.
Poem Content and image Credit to Poet G.D Madgulkar
Read More : चेहरा मराठी कविता | Chehara Marathi Kavita | स्पृहा जोशी
जोगिया मराठी कविता | Jogiya Marathi Kavita | Poet : G. D. Madgulkar
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी
हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.
साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंगवेडी गाथा
मी देह विकुनिया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा
शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या... निघून गेला वेडा!
राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?
तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला
हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे
कवी : ग. दि. माडगूळकर