शाळा : आठवणीतील सुखद प्रवास | ९० व्या दशकातील शाळेतल्या आठवणी

SD &  Admin
0


शाळेला विद्येचे मंदिर म्हणतात. या मंदिरात विद्यार्थी ज्ञान अर्जित करतो आणि या अर्जित केलेल्या ज्ञानाच्या मदतीने त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला मात करतो. प्रत्येक व्यक्तीचे भविष्य हे शाळेतच घडत असते. जसे म्हणतात ना... बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्याच्या गुण- अवगुणावरून त्याचे पुढील भविष्य निर्धारित करते.

‘माझी शाळा’ या माझ्या सुखद प्रवासाबद्दल लिहिताना खूप खूप आनंद होत आहे. माणसाला आपल्या भूतकाळातील आठवणीने मन कसं आनंदून जाते. मग त्या आठवणी बालपणातील असतील तर आणखीनच मनाला खूप खूप आनंद होत असतो. अशा आठवणी आपण जेव्हा इतरांना ही प्रवाहित करतो, तेव्हा आपल्याला त्याहून आनंद होत असतो. माझं ही असच झालं आहे. माझ्या शाळेच पर्व हे खूप मजेशिर आणि आनंदीदायक होते. आज ही त्या आठवणींनी आकाश ठेंगण होतं.

शाळा : आठवणीतील सुखद प्रवास | ९० व्या दशकातील शाळेतल्या आठवणी

    
माझ्या शाळेविषयी लिहिताना सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही आहे. प्रत्येक आठवणी एका पेक्षा एक  सरस आहेत. शेवटी सुरवात तर करावी लागणार. म्हणून मी माझ्या शाळेतला पहिला दिवस आणि जून महिन्यातला पहिला पाऊस, येथूनच सुरवात केलेली उत्तम राहील.

माझ्या बालपणी शाळेत बालवाडी वैगरे नव्हती. म्हणून एकदम पहिलीतच आमची शाळेत एन्ट्री झाली होती. गावात चौथीपर्यंत शाळा होती. त्यानंतर पुढे दुसऱ्या गावात जावं लागायचं. माझ्या गावात चौथी पर्यंत शाळा होती, ती पण एका खोलीची. एकाच खोलीत चार वर्ग भरलेले असायचे. आणि असं असले तरी शिक्षणात आम्ही कोठेही कमी नव्हतो. शिक्षक आम्हाला कळकळीने शिकवायचे.

जून महिन्याचे दिवस होते. आपल्याला माहीतच आहे, कोकणात पाऊस मुसालदार पडतो. बरोबर जून महिन्यात मुलांची शाळेला जाण्याची घाई आणि त्याच मुहूर्तावर पावसाळा पडण्याची घाई. हे समीकरण मला वाटतं, पुढील दहावी शिकेपर्यंत तरी, कधी चुकलेलं नव्हतं. माझ्या शाळेचा पहिला दिवस म्हणून मी खूपच उत्साहात होतो, बरोबर थोडा हिरमुसला देखील होतो. कारण की, आता शाळा सुरु होणार आणि दिवस भर दंगा मस्ती करणे,  खेलने, खोड्या करणे बंद होणार. पण काहीही असले तरी, शाळेचा पहिला दिवस म्हणून मी आनंदीच होतो. शाळा घरापासून हाकेच्या अंतराएवढीच होती. परंतु पावसाचे प्रमाण खूपच असल्यामुळे छत्री ही हवी असतेच. मी पहिल्या दिवशी लवकर उठून, सगळ्या विधी आटपून, माझी शाळेची पिशवी तयार केली. तुम्हाला सांगतो, त्यावेळी माझ्याकडेच नाही तर, इतर कोणाकडे ही स्कूल बॅग नव्हती. म्हणून आम्ही सर्वजण अधिकतर कापडी पिशवीचाच स्कूल बॅग म्हणून उपयोग करत असत. कापडी पिशवीतून पावसाचे पाणी आत प्रवेश करू नये, म्हणून वह्या, पुस्तके आणि पाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ती कापडी पिशवीत भरत असत. म्हणजे भिजण्याचा प्रश्न नव्हता. आणि असं फक्त पावसाळ्याच्या दिवसातच करावं लागायचं.


Read More बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in marathi

    
पहिल्या दिवशी मी शाळेत जाण्यासाठी लवकरच तयार झालो. बाहेर पाऊस हा धो धो म्हणून पडत होता. खरं म्हणजे, आमच्याकडे एकच छत्री होती. ती पण माझ्या भावाकडे होती. आणि घरच्यांनी मला बजावून सांगितलं होतं की, तू दादाच्या छत्रीतून शाळेत जा. पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. मला छत्री हवीच, म्हणून हट्टच करून बसलो होतो. आणि वरती धमकी ही दिली होती की, छत्री दिली तरच शाळेत जाईन. शेवटी भावाकडची छत्री मला देण्यात आली आणि भावाला घरातील जुनी मोडकी छत्री, तिला डागडूजी करून देण्यात आली. मला तर.., खूपच आनंद झाला होता. शाळेतला पहिला दिवस म्हणून मी उड्याच मारत होतो. माझी आई मला बजावून सांगत होती, छत्री व्यवस्थित घेवून जा आणि पाठी आणि पुस्तकं भिजवू नको. तुम्हाला सांगतो, मी पहिलीला शाळेत असताना, आम्हाला पाठी बरोबर फक्त एकच मोठं पुस्तक होतं. त्या पुस्तकात सगळेच विषय होते. काहीतरी नवीन आपल्याकडे आले की, खूप आनंद होतो, तसच मला त्यावेळी वाटत होतं.  मन एका वेगळ्याच दुनियेत असते. या दुनियेत माझ्या खोड्या काही कमी होत नव्हत्या. आणि माझ्या घरच्यांना देखील माहित होतं की, मी किती खोडकर आणि मस्ती खोर आहे ते. कोणतीही गोष्ट असो, सरल करणे मला जमायचंच नाही. म्हणून त्यांनी माझ्या भावाला माझ्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं. माझा दादा तसा प्रेमळच आहे, पण कधी- कधी अति मस्ती करताना मला बघितलं की, मला फटका लावून द्यायचा. मग काय, मी त्याच्या पाठीमागे दगड घेवून असा पाठी लागायचा की, तो घराकडे पळूनच जायचा. मला खूप आनंद व्हायचा. मला वाटायचं, मला घाबरून गेला. पण मला माहित असायचं, घरात कोणाचा तरी फटका वैगरे खावा लागणार. कारण माझी मस्ती करण्याची रीतच वेगळी होती. काहीतरी तमाशा केल्याशिवाय जमतच नव्हतं.

पहिला पाऊस आणि न भिजणे हे बालमनाला कधी पटणार आहे का? पण शाळेच्या पहिल्या दिवसाचा मान राखून कसा बसा शाळेत पोहोचलो. शाळेत गोंगाटा सुरु होता. सगळेच नवीन असल्यामुळे सगळ्यांचा उत्साह उतू जात होता. शेवटी गुरुजींची दहाड पडली आणि आम्ही सगळे शांत झालो. बाहेर पाऊस धो धो पडत होता. माझे मन अगदी बाहेर जाण्यास धावत होते. परंतु करणार काय, काहीच पर्याय नव्हता. इकडे गुरुजींनी प्रत्येकाला आपले नाव सांगायला सांगितले. माझे लक्ष नव्हते. गुरुजींनी एक खडू माझ्याकडे मारला, तो माझ्या गालावर येवून पडला. मी जागा झालो. शेवटी म.. म.. करत माझ्या नावाचे कथन केलं. तसं मला नाव सांगायची गरज नव्हती, कारण माझा पराक्रम हा आधीपासूनच गुरुजींना माहित होता. माझं घर शाळेच्या जवळ असल्यामुळे, मी सगळ्यांचाच परिचयाचा होतो.

शाळा हे माझं दुसरं घर होतं. या घरात ज्ञानाबरोबर जीवाभावाचे मित्र आणि मैत्रिणी भेटल्या. जसे घरात भावंडाबरोबर मस्ती करायचा, तसेच शाळेत देखील मित्र आणि मैत्रिणीबरोबर मस्ती, खोड्या करायला मिळायच्या. आवडते शिक्षक, शिक्षिका भेटल्या. आणि दुसरं म्हणजे शाळेतल्या मधुर आठवणी भेटल्या, त्या भविष्यात मला सुखद आनंद देतील. आणि आज तसेच घडत आहे. शालेय दिवस म्हणजे आयुष्यातील आठवणींची खरी खुरी पुंजी असते. ही पुंजी कधीच संपत नाही तर, ती आठवणीच्या प्रवाहाबरोबर वाढतच जाते. या प्रवाहात वाहत जाणे म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात असणे होय. या प्रवाहात मधुर आठवणी आपल्याला स्वर्ग सुखाची अनुभूती करून जातात. माझ्या शालेय आठवणी अशाच मधुर आठवणींचा ओसलता झरा आहे आणि तो कधी ही न संपणारा आहे.

शाळेत असणं  आणि खोड्या न काढणं, हे समीकरण कधी जुळणार आहे का? शाळेतल्या खोड्या या खूपच नटखट असतात. या खोड्या निरागस स्वरूपाच्या असतात. कोणाला इजा किंवा अपमान करण्याचा कोणताच हेतू नसतो. खोड्या बहुतेक करून मुलींच्या काढण्यात खूपच आनंद वाटायचा. आणि या वयात तक्रारी वैगरे निघतात, परंतु शेवटी विजय हा आमचाच होत असायचा. अशा वयात खोड्या या असणारच, हे समीकरण कदाचित मोठ्यांना ही समजलं  असावं. कारण ते ही या वयातून गेलेले असतात.


बालपण हे सगळ्यांसाठीच प्रिय असतं. आपण बालपणीच्या आठवणींपासून कधीच वेगळं राहू शकत नाही. सुख- दु:खाच्या चढ उतारावर बालपणीच्याच आठवणी आनंदाचे झाड म्हणून आपल्या सेवेला धावून येतात. आणि त्यात आपण मनसोक्त डुबकी मारतो. अशाच बालपणीच्या पारावर आपण केलेल्या बाललीलांच आनंदाचं झाड हे पुस्तक आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला नक्कीच तुमच्या  बालपणीच्या विश्वात घेवून जाईल, हे विश्वासाने सांगेन. तुम्हाला जर बालपणीच्या विश्वातले जग जगायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. शुल्क फार कमी आहे. PDF, Amazon Kindle आणि Google Play Store वर उपलब्ध आहे.

 


 Now Available on Google Play Store : माझं गाव माझं बालपण 

एक एक वर्ष जसं पुढे ढकलत जाते, तसे आमचे वर्ग देखील पुढे पुढे ढकलत जातात. येणाऱ्या वर्षाच स्वागत आणि पाठीमागे गेलेल्या वर्षाला आपण बाय बाय करतो. परंतु आपल्याला हे लक्षात असायला हवं आहे की, बाय बाय केलेल्या वर्षाने आपल्याला खूप काही दिलेले असते. मधुर आठवणी त्या मधला एक भाग. खोड्या, मस्ती, मित्र मैत्रिणींच प्रेम, भांडणं. गुरुजींचा मार, शाबासकी, शाळेतील प्रेत्येक कार्यक्रमामध्ये घेतलेला सहभाग, मित्र मैत्रिणींचे चोरून खाल्लेले डब्बे, शाळेच्या व्हरांड्यात ओणवे राहिलेल्या आठवणी. आणि बरच काही. आपल्याला गेलेल्या मधुर आठवणींनी ओलेचिंब करून टाकते. आज जेथे आहे तेथून बालपणीच्या शालेय विश्वात डोकावून पाहतो, तेव्हा मन उत्साहित होतं. आलेला सगळा त्राण कुठच्या कुठे पळून जातो. आज कधीतरी मित्र-मैत्रिणींना फोन होतात. शाळेतील इकडच्या तिकडच्या आठवणींना उजाळा देतो. पण कधी कधी वाटतं, आज माणसं स्वतःला खूपच बिझी ठेवतात. साहजिक आहे, वयाने माणूस जसा मोठा होत जातो, तसे त्याच्यावर अनेक जबाबदारी येवून जातात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन त्यांचा बदलत जातो. जीवनाला फक्त संघर्ष समजून फक्त येणाऱ्या काळाबरोबर लढत राहतो. परंतु मला वाटते, संघर्ष हा मानवाला करावाच लागतो. परंतु संघर्षाची तलवार एवढी ही चालवू नका की, त्यामुळे तुम्हाला गेलेल्या आयुष्याचा विसर पडावा. आयुष्य आपल्याला वाटतं तितकं मोठ नाही आहे. या एवढ्याशा आयुष्यात माणसाला आनंद शोधता आला नाही तर, स्वतः साठी केलेल्या त्या संघर्षाचा काय उपयोग. स्वतःच्या मुलां–बाळांसाठी कष्ट करताना, स्वतःच विश्व मात्र तुम्ही विसरून जाता. मित्रानों एकदा नक्कीच विचार करा. 

Read More : पक्षांची शाळा | Pakshanchi Shala | 90th Childhood Memories

    
शाळा हे मधुर आठवणींच विश्व असते. या विश्वात आपल्याला ज्ञान मिळते. एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी खूप मित्र-मैत्रिणी भेटतात. आदर्श गुरुजन भेटतात. या विश्वात आपल्याला चुकांची सुधारणा करण्यास संधी मिळते. खेळात जसे आज हार आहे, तर उद्या जीत आहे. त्याचप्रमाणे शाळेत आपल्याला हार- जीतच्या रस्सीवर समतोल राखण्यास संधी मिळते. जगात हीच अशी जागा आहे, तिथे हरल्यावर परत जिंकण्यासाठी आपल्याला गुरुजन, आपले मित्र-मैत्रिणी मदत करत असतात आणि आपल्याला पुनः उभ राहण्यास संधी मिळते.

आज तिशी उलटली असली तरी, शाळेतलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून हातात लेखनी कायम असते. काहीतरी लिहित असतो. शाळेनं दिलेल्या ज्ञानाचा सतत कुठे ना कुठे उपयोग होत जावा, कुठेही त्याला अंतर पडू नये म्हणून धडपडत असतो. जसं या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं, माणसाच जस जसं वय वाढत जाते, तस तसे तो बालपणीच्या मधुर आठवणीत रमून जातो. जीवनात दु:ख असतील तर, अजूनच बालपणीच्या आठवणीत रमून जायला होतं. खरं तर.., डोळ्यात अश्रू असतात, पण नकळत बालपणीचा एक मधुर क्षण आठवला जातो आणि गालावर अलगद स्मिथ हास्य येते. माझं ही बराच वेळा असं होतं. कदाचित तुमचही होत असावं. बालपण सगळ्याचंच प्रिय असते.

जेव्हा कधी दु:ख माझ्या मनावर आक्रमण करत असतात, तेव्हा स्वप्नात मी बालपणी केलेली शाळेतील मजा-मस्ती, खोड्या, गुरुजींचा मार, त्यांनी दिलेली शाबासकी, अशा अनेक प्रकारच्या निरागस आठवणींना उजाला देत असतो. सकाळच्या प्राथनेच्या वेळी शेवटच्या रांगेत उभा राहून, पुढच्या मुलाची कल काढण्यात मजा ही कुछ ओर होती. आणि एकदा कदाचित गुरुजींच्या तावडीत जर आपली खोडी आली तर, मग समजून जायचं, व्हरांड्यात ओणवं राहणे हे आलेच. पण आज जर मला कुणी म्हंटल की, मी तुला तुझं लहानपणीच बालपण देतो, पण तुला दिवस भर ओणवं राहवं लागेल, तर मी क्षणाचा ही विलंब न करता दिवस भर ओणवं राहयला तयार होईल. आज तो क्षण मला स्वर्गासुखा सारखाच वाटेल.

शाळा हे नुसत मंदिर नसून विद्यार्थ्यांचे ते माहेर घर असते. या घरात त्याचे आई-बाबा प्रमाणे गुरुजन वर्ग असतो. भाऊ-बहीणी प्रमाणे मित्र-मैत्रिणी असतात. ही सगळी आपल्या जीवा भावाची असतात. सतत आपल्या सोबत असतात. कुठं चुकलं तर माफ करतात आणि पुन्हां असं व्होऊ नये म्हणून मार्गदर्शन करतात. जीवनात कधी दु:ख आली तर, मदत करण्यास पुढे हजर राहतात. खरच.., जेवढा गोडवा गावा तितका कमीच आहे, असं वाटतं. आणि का वाटणार नाही, शाळा आहेच आपले माहेर घर. आणि माहेर घर म्हणजे आपले हक्काचे आणि प्रेमाच्या माणसांचे स्थान असते. तिथे फक्त आणि फक्त आपल्याला प्रेमच भेटते.

माझे रसिक मित्र आणि मैत्रिणींना सांगू इच्छीतो की, माझ्या शाळेविषयी लिहिताना खूप खूप आनंद होत आहे. माझ्या शाळेतील प्रत्येक क्षण मनाला आणि हृदयाला आनंदाश्रूनी भिजवणारा होता. आज येथे मी माझ्या गुरुजनांच आणि बाल मित्र आणि मैत्रिणींच आभार आणि कौतुक करतो. कारण हे सगळे माझ्या बालपणीच्या सुखद आयुष्याचा भाग होते. यांच्याशिवाय माझं बालपण अधुरं आहे..... भेटूया पुन्हा पुन्हा..... 





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!