जंगल भटकंतीचा एक दिवस | A Day in Jungle Safari | A Peaceful Day in Jungle Safari

SD &  Admin
0


कुहू.... कुहू... कोकीळाचा मधुर आवाज कानी आला की, मनाला कसं बरं वाटतं. मन प्रसन्न होतं. आणि जर पहाटे सकाळी सकाळी असा मधुर आवाज कानी आला तर, आणखीनच मन सुखावून जातं. हंतरूनातला आळस कुठच्या कुठे गायब होतो. हंतरुणातून उठून जेव्हा घराच्या अंगणात येतो, तेव्हा त्या गाणे गात असलेल्या कोकिळाला पाहून निसर्गाच्या अद्भुत किमयेचा अनुभव येतो. चारी दिशां सकारात्मक उर्जानी भरून गेलेल्या असल्यासारख्या वाटतात.

प्रसन्न मनाने सुरुवात झाल्यामुळे, मन ही सकारात्मक उर्जाने भरून जाते. सगळं काही चांगलं चांगलं वाटतं. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी मन अधीर होते. जिकडे तिकडे रानावनात मुक्तपणे फिरावेसे वाटते. झाडे-झुडपे, पशु पक्षांशी बोलावेसे वाटते. त्यांच्यात एक होऊन निसर्गावर प्रेम करावेसे वाटते. हिरव्या गार गवतावरून अलगद उडी मारत वाऱ्याच्या वेगाबरोबर सैरा-वैरा दौडत जावेसे वाटते. काय करावे आणि काय नाही असे होऊन जाते. मला वाटतं, असं प्रत्येकाच्या एकदा तरी मनात नक्कीच आले असणार आहे. आणि का येऊ नये, निसर्ग मुळात आहेच इतका सुंदर. मला ही हा मोह आवरला नाही आणि पक्क केलं जायचं ‘जंगल वारीला.’

श्रावण महिन्याचे दिवस होते. त्या दिवशी पहाटे सकाळी लवकरच उठलो. पहाटेची गुलाबी थंडी शरीराला आकर्षित करत होती. वातावरण ही खूप छान होते. त्यातच निसर्ग अगदी झाडा झुडपांनी नटलेला होता. सगळीकडे हिरवे गार दिसत होते. भात शेती अगदी कमरे इतकी वाढलेली होती. त्यामुळे पूर्ण गावं भातामध्ये लपलेलं असल्यासारखे वाटत होते. मनात निश्चय केला होता, आज मनसोक्त जंगल वारीचा आनंद घ्यायचा. सगळं काही विसरून फक्त आणि फक्त निसर्गाच्याच कुशीत दिवस घालवायचा. विचार पक्का केला आणि जाण्याची तयारी सुरु केली.

सकाळचा नाश्ता झाला, बरोबर दुपारचा जेवणाचा डबा घेवून जंगलाच्या दिशेने माझ्या जंगल वारीला सुरुवात केली. जंगलवारी नक्कीच माणसाच्या खचलेल्या मनाला बाहेर काढण्यास मदत करते, याचा अनुभव मला येत होता. आज माझ्या बरोबर कोणीही नव्हतं. आज निश्चय केला होता, एकटाच जंगलवारी करायची. निसर्गासी एकरूप होवून, त्याच्या अद्भुत आविष्काराचा आनंद घ्यायचा.

A Peaceful day in Jungle

गावाची सीमा ओलांडून जंगलात प्रवेश केला. सगळीकडे मोठ मोठी झाडे डौलात उभी होती. जंगलात एक वेगळीच शांतता होती. ही शांतता मनाला सुखावह देत होती. अधून मधून पक्षांचा किल बिल करण्याचा आवाज येत होता. मधेच छोटे छोटे प्राणी आपले दर्शन देत होते. मला त्या गोंडस छोट्या छोट्या निरागस प्राण्यांना बघून खूप आनंद होत होता. वाटत होतं, त्यांना जवळ घेवून प्रेमाने कुरवाळावे. परंतु ते मला बघाताच धूम ठोकत होते. कदाचित त्यांना वाटले असेल की, कुणी त्यांचा दुश्मन त्यांच्या दिशेने येत आहे. आणि त्यांचा असा विचार करणे हे स्वाभाविक आहे. आज माणूस जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार करत आहे. त्यांचा जगण्याचा अधिकारच माणसाने हिरावून घेतला आहे. मी हे समजून गेलो आणि त्यांना त्रास न देता माझ्या वाटेने शांतपणे चालू लागलो.

मी चालता चालता प्रत्येक गोष्टींच निरीक्षण करत पुढे जात होतो. मी माझ्या कॅमेरात आवडीचे दृश्य कैद कर करत होतो. प्रत्येक आवडत्या गोष्टींच जतन करणे आवश्यक आहे, कारण पुढे मागे आपल्याला या गोष्टींची आठवणी मनाला खूप आनंद देत असतात. खरं तर, माझा हा छंदच आहे. आणि मुळात निसर्गरम्य कोकणात जन्म झाल्यामुळे अशा गोष्टींची आवड लहानपणापासूनच आहे. पुढे वाटेतच मला आवळ्याच्या झाडाने दर्शन दिले. आवल्यानी झाड अगदी भरगच्च भरून गेले होतं. मला मोह आवरेना. मी लगेच एक छोटीसी फांदी खाली ओढून दहाबारा आवळे खिशात भरले. आणि आवल्यांचा तुरट स्वाद घेत पुढे जाऊ लागलो.

वाटेत अनेक लहान- मोठी झाडे हलत डुलत होती. जसे काही ते मला संकेत देत होते की,   आम्ही ही तुझ्या सोबत आहोत. मी ही त्यांच्या सावलीत उभा राहून, त्यांचे आभार मानत होतो. काय गमंत आहे बघा..., निसर्गाने आपल्याला आवश्यक सगळ्या गोष्टी किती भर भरून दिल्या आहेत. तरीही येवढे असताना, आपण मात्र निसर्गाला इजाच पोहोचवत असतो. मला आज कुठे तरी माणूस म्हणून त्यांच्या सावलीत उभे राहताना लाज वाटत होती. बघाना....ना, जो आपल्याला कोणतीही अपेक्षा न करता दान करतो, त्यालाच आपण दु:ख देतो. आणि वरून आपण काहीच केलं नाही, असे वागून त्याच्याच सावलीत उभे राहतो. माणसाच्या या स्वभावाला काय म्हणावे, हेच मुळात कळत नाही.

आज मी मात्र पक्क केलं होतं, निसर्गाला कोणतीही इजा न करता, आजचा दिवस मनसोक्त त्याच्याबरोबर आनंदात घालवायचा. थंड गारवा देणाऱ्या झाडाच्या सावलीला अभिवादन करून पुढे चालू लागलो. निसर्गाने जसे काही माझ्यावर झाडाच्या सावलीच्या रूपाने पांघरून घातल्यासारखे वाटत होतं. शरीराबरोबर मनाला ही थंड गारव्यासारखे वाटत होतं. निसर्गाने मनाला घातलेली ही सुखावह थंड भुरळ मनाला इकडून तिकडे सैरावैरा दौडवीत होती. मी ही मनाला वाटेल तसं निसर्गासी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होतो. झाडा झुडपांनी अच्छादलेल्या सावलीत, मधूनच एखादं सूर्याच किरण सोन्याच्या चकाकी सारखं वाटत होतं. निसर्गाचं एवढं मनमोहक दृश्य आपल्याला फक्त जंगलातच पाहयला मिळतं.

Read More :  पुण्यातील सुंदर पर्यटन स्थळे : Famous Tourist Places in Pune District in Marathi

मोर, चिमण्या आणि अन्य इतर पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत होते. त्या छोट्या-मोठ्या पक्षांची चंचल किलबिल शांत रानाला उत्साहित करत होती. अधून मधून मोरांचा मधुर आवाज कानाला ऐकू येत होता. मोर जेव्हा पिसारा फुलवून नाचतो, तेव्हा त्याचे रूप खूपच मनमोहक वाटते. वाटतं, आपण ही त्याच्याबरोबर धुंध होवून नाचावे, बागडावे. अशाच काही विचारात पुढे चालत असतानाच, एका सुंदर मोर मला दर्शन देतो. परंतु ते भाग्य काही क्षणा पुरतेच ठरले. कुणास ठावूक त्याला माझी चाहूल लागली की काय, तो तेथून निघून जातो. किती सुंदर दृश्य होते ते. माझाच मला राग येत होता. थोडा वेळ दुरूनच पाहायला हवे होते. कदाचित त्याचे दर्शन खूप वेळ पाहायला मिळाले असते. असो.., दर्शन दिले एवढेच माझे भाग्य. आज कुठे मोर पाहायला मिळतात. माणसाच्या क्रूर स्वभावामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मी त्याने दर्शन दिलं, यातच समाधान मानत पुढील प्रवासाला निघालो.

सूर्य डोक्यावर येत होता. सूर्याची अतिनील किरणे झाडा झुडपाच्या पानांना छेद देत जमिनीवर येण्याचा प्रयत्न करत होती. परंतु झाडा झुडपाच्या कृपेमुळे जमिनीचा गारवा टिकून होता. याच झाडा-झुडपामुळे वन्य जीव प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण होत असते. निसर्गाची कृपा आघात आहे. निसर्ग अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे सगळ्याच प्राण्यांची काळजी घेत असतो. खरं तर, माणसाला याच काहीही देणं घेणं नसते. असु दे.. कधी ना कधी त्याला त्याची चूक नक्कीच समजेल. तहान खूप लागल्यासारखे वाटत होते. बॉटल मधील पाणी कधीच संपले होते. म्हणून कुठे पाण्याचा झरा आहे का ते पाहत होतो. श्रावण महिना असल्यामुळे कुठे ना  कुठे तरी पाण्याचा स्त्रोत हा असणारच, याची मला खात्री होती. म्हणून पाण्याची छोटीच बॉटल सोबत आणली होती, त्यामुळे ती लवकरच संपली होती. पाण्याचा झरा हा ओढ्याच्या जवळ असणारच म्हणून ओढ्याच्या दिशेने जाऊ लागलो. निसर्गाच्या कुशीत जन्म झाल्यामुळे नदी, नाले, ओढे कुठे आहेत याची आधीपासूनच माहिती होती. परंतु नदीपाशी पिण्या योग्य पाणी असेल याची खात्री नव्हती. म्हणून ओढ्याच्या दिशेने जाऊ लागलो. ओढा जवळ येताच चेहऱ्यावर हसू आले. येथे कुठे तरी पिण्या लायक पाणी असणार हे माहितच होते. म्हणून मी ओढ्याच्या बाजूने झरा शोधू लागलो. खरं तर, मला झरा शोधण्यास जास्त वेळ लागला नाही. काही वेळातच मला झरा सापडला आणि झऱ्यापाशीच दुपारचे जेवण करायचे ठरविले. तुम्हाला सांगतो, रानात जेवण करण्याची मजा अगदी निराळीच आणि मनाला आनंद देणारी असते. स्वच्छ सुंदर वातावरणात आणि हिरव्या गार वनराईत जेवणाचा स्वाद रोजच्या जेवणापेक्षा अधिक वाढून जातो. मला ही त्याचा पुरेपूर अनुभव येत होता. जेवण संपताच झऱ्यांतील गोड पाण्याने माझी तहान भागविली आणि बॉटलमध्ये पाणी भरून निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पुढे जायलो निघालो. गार गोड पाणी आणि पोटाची शुदा शांत झाल्यामुळे ताजेतवान वाटत होते. ओढ्याच्या बाजूने जात असताना मला माशांना पकडण्यासाठी जाळे  लावलेले दिसले. मी थोडे पुढे जावून जाळ्यात डोकावून बघितले तर, खूप सारे मासे जाळ्यात उड्या मारत होते. ते  जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करत होते. मला त्यांची अवस्था बघून खूप दया आली. त्याबरोबर माणसाच्या या प्रवृत्तीचाही खूप राग आला. निसर्गातून सगलं काही मिळत असतानाही, माणूस या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना मारून का खातो? हेच मुळात कळत नाही. मी पुढे अजून काहीही विचार न करता पाण्यात उतरलो आणि जाळे मोकळे करून त्यातून माशांना मुक्त केले. जाळ्यातून मुक्त होताच सगळे इकडे तिकडे आनंदाने उड्या मारत पाण्याच्या प्रवाहबरोबर निघून गेले. मनात एक विचार आला. या जगातील कोणताही प्राणी असो, ज्या वेळी तो मृत्यूच्या दारातून सुखरूप परत येतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, त्या आनंदाची बरोबरी, किंमत कशाबरोबर ही होत नाही. आणि खरं तर, माणसाला याची पूर्ण जाणीव असायला हवी की, कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचविण्याचा आणि मारण्याचा त्याला कोणताही अधिकार नाही आहे. परंतु काश माणसाला याची जाणीव असते तर... असो....

मनाला समाधान वाटलं. पाण्यात मुक्तपणे उड्या मारणाऱ्या त्या माशांकडे स्मितहास्य करून, मी माझ्या पुढील प्रवासाला निघालो. आज निसर्गाने हिरवीगार साडीच घातलेली आहे, असे वाटत होते. त्याचे ते सुंदर मनमोहक रूप बघून मला शहरी जीवन सोडून निसर्गाच्या कुशीतच राहवे असे वाटत होते. आज माझ्यासमोर वाईट असे काहीच घडले नाही. सगळीकडे शांतता वाटत होती. येथे तुम्हाला आवर्जून आणि कळकळीने सांगावेसे वाटते. बघाना... ना,  जेव्हा एखादा प्राणी आपले घर सोडून, म्हणजेच जंगलातून गावाच्या वेशीत किंवा शहरात चुकून येतो, तेव्हा आपण त्याचे स्वागत करायचे सोडून त्या बिचाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला मारण्यासाठी असा काय धावत जातो की, तो आपला जानी दुश्मन आहे. परंतु हेच जेव्हा एखादा मनुष्य त्यांच्या घरात म्हणजेच जंगलात प्रवेश करतो, तेव्हा सगळे प्राणी त्याला सुरक्षित वाट देवून, त्याच्यापासून दूर राहतात. त्यांना तुमच्या येण्याने कोणत्याही प्रकारचं दु:ख किंवा शत्रुता वाटत नाही. बिचारे तुम्हीही त्यांचाच भाग समजून, तुमचे ते स्वागत करतात. या वरून तुम्हाला समजले असेल की, मनुष्य किती क्रूर प्राणी आहे. खरं तर... पशु माणसालाच म्हटले पाहिजे आणि तो आहेच.. असे मी समजतो. मूर्खांना या बिचाऱ्या प्राण्यांना मारताना लाज कशी वाटत नाही.... ईश्वराकडे प्राथना करतो की, या मनुष्य प्राण्याला एकदा अशी शिक्षा दे की, तो असा क्रूर पणा कधीच करणार नाही.                    

Read More: कोंकणातलं निसर्गाचं मनमोहक दृश्य | डिलाईट लाइफ स्टाईल

आज जंगलात फिरताना मला कोणत्याही प्रकारच भीती वाटली नाही. वाटत होतं, कोणी तरी माझ्या सोबत आहे. मी ही निर्भय होवून जंगल वारीचा आनंद घेत होतो. निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा जवळून आस्वाद घेत होतो. आज धन्य वाटत होते.  मध्यानं होवून दिवस परतीकडे चालला होता. आज खरच, रात्र देखील जंगलामध्ये काढावी असे वाटत होते. रानावनाचे ते सुंदर हिरवेगार नटलेल रूप पाहून, मी त्याच्या प्रेमातच पडलो होतो.

सायंकाळ होत होती. गावातील माणसांनी आपल्या गाई बैलांना चरवण्यासाठी जंगलात आणले होते. मला ही त्यांची साथ भेटली. सायंकाळची ती लालभडक शांती मनाला सुखावून सोडत होती. तुम्हाला सांगतो, सूर्य जेव्हा अस्ताला जातो ना.. त्या वेळी तो शीतल लाल भडक दिसतो. त्याचे मनमोहक रूप बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडू शकतं. तसच माझं झालं..

दिवसभर चरून गाई बैलांची शुदा शांत झाली होती, तसी ती घराच्या दिशेने चालू लागली. मला ही सोबत भेटली. दिवस भर एकटाच इकडे तिकडे वाऱ्यासारखा फिरत होतो. आता मस्त त्यांच्या पाठोपाठ मी ही शांतपणे चालू लागलो.

गावाच्या हद्दीत प्रवेश केला आणि गाव जणू काही सूर्याच्या लालभडक रंगात बुडाले आहे, असे वाटत होते. खरच, आजची जंगल वारी अविस्मरणीय आणि मनाला आनंद देणारी होती. खूप छान वाटत होते. अजून ही जंगल वारीचा आस्वाद घेतला असता, परंतु दिवसाला मी थांबवू शकत नव्हतो.

मला वाटतं.., एकदा तुम्हाला ही जंगल वारीचा आनंद घ्यायला हवा. खरच, मनाला खूपच समाधान वाटते. काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटते. या जंगल वारीतून मनामध्ये सकारात्मक उर्जा प्रवाहित होतेच, बरोबर निसर्गाच्या अद्भुत निर्मितीचा अनुभव येतो. माझ्या आजच्या अनुभवाच्या आधारे सांगू शकतो, तुम्ही जर हे केलत तर, शहरी जीवन आणि निसर्गाच्या कुशीतील जीवन यांच्यातील सुखी जीवनाची व्याख्या अचूक पद्धीतीने मांडू शकता. आणि मला विश्वास आहे की, तुम्हाला कोणतं जीवन जगायला आवडेल..................... एकदा नक्कीच भेट द्या.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!